रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार, मासेमारीही बंद ठेवण्यात येणार असून मतदान केंद्रापासून १०० मीटर परिसरातील दुकानेही बंद ठेवण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आठवडा बाजारही पूर्ण वेळ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.जिल्ह्यात १९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व मच्छिमार नौका बंदरामध्ये ठेवून मच्छिमारीशी संबंधित कोणतेही कामकाज न करण्याबद्दल मच्छिमार नौकामालकांना कळविण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त आनंद पालव यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व मच्छिमार संस्थांची दूरददृश्यप्रणालीद्वारे बैठक घेऊन त्यांना याबद्दलच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्व आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी किंवा काही तासांची सवलत द्यावी, असे आदेशही देण्यात आले असून सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याने मतदान करता न आल्याची तक्रार प्राप्त झाल्यास त्या संस्थांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
रत्नागिरीत मतदानानिमित्त आठवडी बाजार, मासेमारी बंद
