रत्नागिरीच्या ‘आरे-वारे’ समुद्रकिनारी उभारणार आता ‘ॲडव्हेन्चर पार्क’

५ कोटींचा निधी देणार पालकमंत्र्यांचे निर्देश

रत्नागिरी – जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील एक जुळा समुद्र किनारा समजले जाणारे आरे-वारे हे पर्यटन स्थळ पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. याच पर्यटनस्थळी आता परदेशातील ॲडव्हेन्चर पार्कप्रमाणे पर्यटनावर आधारित सविस्तर प्रकल्प राबविला जाणार आहे. वनविभागाने यासंबंधीचा अहवाल तयार करावा. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून ५ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विश्रामगृहात पालकमंत्री सामंत यांनी नुकतीच विविध विषयांवर बैठक घेतली. यावेळी त्यांनी वनविभागाला काही सूचना केल्या.या बैठकीला उपवन संरक्षक गिरिजा देसाई, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे तांत्रिक सल्लागार सुनील देशमुख, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, गटविकास अधिकारी जे. पी.जाधव, प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे उपस्थित होते. मंत्री सामंत म्हणाले की, वनपर्यटन, इको टुरिझम याबरोबरच वॉच टॉवर दुरुस्ती, वनभ्रमंती पोर्टल, आवश्यक असणाऱ्या बसेस, महिंद्रा जीप यासारख्या सुविधांवर वनविभागाने भर द्यावा. त्याचबरोबर जुवे जैतापूर येथे कांदळवन आधारित नियोजन करावे. स्मार्ट सिटीबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि रत्नागिरी नगर परिषदेने तातडीने नियोजन करून विकासकामांना सुरुवात करावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग १६६, महिला बचत गट, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व जिल्हा नियोजन समितीच्या खर्चाचा आढावाही घेतला. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण गटविकास अधिकारी यांची बैठक तहसीलदारांनी घ्यावी आणि मिऱ्या-शिरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मार्गी लावावी. या योजनेसाठी ज्या-ज्या गावांतून अडचणी येत आहेत, त्याबाबत संबंधित गावांच्या सरपंचांबरोबर बैठक घेऊन त्यांना त्याची माहिती द्यावी, अशीही सूचना केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top