प्रयागराज – प्रयागराज येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत सारे जग मृतांचे आकडे देत असताना योगी आदित्यनाथ मात्र केवळ काही लोक जखमी झाल्याचे सांगत होते. त्यामुळे मृतांना साधी श्रद्धांजलीही वाहता आली नाही. त्या विरोधात जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी योगींवर प्रखर टीका केली असून योगी आदित्यनाथांना तात्काळ मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या संदर्भात शंकराचार्य म्हणाले की, २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आम्ही नवीन लोकांना सत्तेत आणू. सध्याच्या सरकारला पाठिंबा देणार नाही. त्यांना गर्दी सांभाळता आली नाही. १ हजार लोकांची व्यवस्था असेत तर तिथे ५ हजारांना आमंत्रित करायचे नसते हे त्यांच्या लक्षात आले नाही. मुख्यमंत्री योगी यांच्यासह सर्व सरकारी सोशल मीडिया अकाउंटवर घटनेची योग्य माहिती दिली नाही. त्यामुळे अनेक धर्माचार्यांना या घटनेची माहिती मिळाली नाही. घटनेची माहिती योग्य वेळी मिळाली असती तर परंपरांचे पालन केले असते. महाकुंभमेळ्यातीत तयारी अपूर्ण होती. वाढणाऱ्या गर्दीचा विचार करुन तशी सोय करायला हवी होती.
दरम्यान, परम धर्म संसदेदरम्यान महाकुंभमेळ्यातील सरकार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा उल्लेख करून आणि चेंगराचेंगरीनंतर झालेल्या मृतांची संख्या लपवल्याबद्दल संताप व्यक्त करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. धर्म संसदेत सहभागी झालेल्या सर्व लोकांनी या प्रस्तावाला एकमताने संमती दिली.