लखनौ – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. धमकीचा हा मेसेज मुंबई पोलिसांना मिळाला. याप्रकरणी मुंबई पोलीस सक्रिय झाले आणि मेसेज पाठवणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही महिला मनोरुग्ण आहे.
मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला काल संध्याकाळी एका मोबाईल नंबरवरून मेसेज आला. त्यात म्हटले की, योगी आदित्यनाथ यांनी १० दिवसांत राजीनामा द्यावा नाही तर आम्ही त्यांना बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे मारून टाकू. या घटनेनंतर पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवली आणि एका महिलेला ताब्यात घेतले. २०२४ मध्ये योगी आदित्यनाथ यांना अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी उत्तर प्रदेश, मुंबई आणि बिहारमधून वेगवेगळ्या ठिकाणांहून धमक्या देणाऱ्या आरोपींना अटक केली होती.