पुणे –
कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या येरवडा तुरुंगात दोन मोबाईल सापडले आहेत. या दोन मोबाईलमध्ये बॅटरी असली तरी सिम कार्ड नव्हते. त्यामुळे हे अॅक्टिव्हेट नव्हते. तरीही ते तुरुंगात कसे पोहोचले, याचा आता तपास केला जात आहे.
पुणे पोलिस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० एप्रिलच्या संध्याकाळी घेतलेल्या झडतीदरम्यान, अंडा सेलच्या एका विभागातील स्टीलच्या गेटमध्ये दोन मोबाईल फोन सापडले. पुणे येथील कारागृह विभागाच्या दक्षता शाखेच्या वरिष्ठ जेलर दर्जाच्या अधिकाऱ्याने २० एप्रिलच्या दिवशी अंडा सेलची दुपारी चार वाजता आणि संध्याकाळी सात वाजता अशी दोनदा झडती घेतली. दुसर्या झडतीच्या वेळी हे फाेन एका स्टीलच्या दरवाज्याआड सापडले.दोन वेगवेगलळ्या तीनी कंपन्यांचे लहान आकाराचे ते फोन होते. त्यानंतर येरवडा पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. येरवडा मध्यवर्ती कारागृहातून मोबाईल जप्त करण्याची या वर्षातील ही दुसरी घटना असून, १ एप्रिलला कारागृहातील परिमंडळ क्रमांक १ मधील बाथरूममध्ये लपवून ठेवलेला मोबाईल सापडला होता.
तुरुंग विभागाने या घटनेची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे, एफआयआर नोंदवल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे आणि विविध तपास संस्थांना सक्रिय करण्यात आले आहे, असे पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात अनेक नामचीन गुन्हेगारांना ठेवण्यात आले आहे. या तुरुंगात अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. तरीही गेल्या काही दिवसांत मोबाईल सापडल्याची दुसरी घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कळंबामध्येही मोबाईल सापडला
येरवडा तुरुंगात मोबाईल सापडल्याची घटना उघडकीस आली असताना कळंबा कारागृहातही मोबाईल सापडला आहे. येरवडा कारागृहातील पाच अधिकारी आणि २५ कर्मचाऱ्यांनी कळंबा कारागृहाची झाडाझडती घेतली, तेव्हा हा मोबाईल सापडला. या कारागृहातही अनेक गंभीर आरोपातील कैदी असल्याने या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यात येणार आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.