तासगाव- तालुक्यातील येरळा नदीला आलेल्या पुरामुळे तासगाव ते जुना सातारा रस्त्यावरील तांदळे वस्तीजवळ पुलावरून वृद्ध दाम्पत्य मोटारसायकलसह वाहून गेल्याची घटना काल दुपारी घडली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत एनडीआरएफच्या दोन टीमकडून शोध मोहीम सुरू होती.
चार दिवसांपासूनच्या संततधार पावसामुळे येरळा नदीला पूर आल्याने नदीपुलावरील वाहतूक चार दिवसांपासून बंद होती.मात्र पुलावरील पाणी कमी होताच काही वाहने ये-जा करीत होती.पण काल सकाळी झालेल्या पावसाने नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली.त्यामुळे पुलावरून होणारी वाहतूक पुन्हा थांबवण्यात आली.दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एक वृद्ध दाम्पत्य मोटरसायकलवरूनपुलावरून जाऊ लागले, तेव्हा काही जणांनी त्यांना मज्जाव केला.तरीही हे दाम्पत्य पुलावरून गेले. पुलाच्या मध्यावर जाताच मोटरसायकलसह पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले.पाण्याचा प्रवाह जोराचा असल्याने काठावर असणार्यांना या दाम्पत्याला वाचवता आले नाही.काही मिनिटात दाम्पत्य पाण्यात बुडून दिसेनासे झाले.त्यानंतर शोधमोहीम राबवण्यात आली.तरीही दामप्त्यापैकी कुणी सापडले नाही.हे दाम्पत्य नेमके कोण आणि कोणत्या गावचे होते,हे अद्याप समजलेले नाही. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता मोटारसायकल क्रमांक शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.