येत्या २ दिवसांत ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

मुंबई – मुंबई महापालिका प्रभाग पुनर्रचना प्रकरणी शिवसेना ठाकरे गट येत्या २ दिवसांत सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. उच्च न्यायालयाने शिवसेना माजी नगरसेवक राजू पेडणेकर आणि समीर देसाई यांची याचिका फेटाळल्यानंतर ठाकरे गटाने हा निर्णय घेतला. मुंबई महापालिकेच्या वॅार्डची संख्या शिंदे-फडणवीस सरकारने २३६ वरून २२७ केल्याने ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

राज्यातील अनेक नगर परिषदांमध्ये नगरसेवकांची वाढवलेली संख्या कायम ठेवलेली असताना, फक्त मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या कमी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय दुजाभाव करणारा असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बृहन्मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही संख्या २२७ वरून २३६ इतकी करण्यात आली होती. राज्यात शिंदे- भाजपचे सरकार आल्यानंतर हा निर्णय रद्द करून प्रभाग रचना पूर्ववत करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारच्या नव्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात ठाकरे गटाने दिलेले आव्हान फेटाळून लावण्यात आले. या याचिकेत कोणतेही तथ्य नसल्याने ती फेटाळून लावत असल्याचे उच्च न्यायालयाने निकालात म्हटले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top