ठाणे- जिल्ह्यातील डोंगराळ भागात असलेल्या येऊर गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून दोन बिबटे गुरुवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. निर्सगरम्य येऊरमध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यातच आता बिबटे दिसल्याने ठाणे वनविभागही खडबडून जागा झाला आहे.
येऊरच्या मुख्य रस्त्याला लागून एअर फोर्स कॅम्प आहे. तिथे बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुख्य रस्त्यावरून गुरुवारी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास दोन बिबटे फिरत असल्याचे दिसले. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊनही अद्याप येऊरच्या जंगलात बिबटे आपले अस्तित्व टिकवून असल्याची आनंददायी बाब निदर्शनास आली.त्यामधील एक बिबट्या पूर्ण वाढ झालेला म्हणजे साधारणपणे तीन वर्षांचा तर दुसरा हा एक वर्षाचा असावा, असा अंदाज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ज्या मुख्य रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले. येऊरचे गावकरी आणि मॉर्निंग वॉक करणारे ठाणेकर दररोज या मार्गाचा वापर करतात.त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता या भागात जनजागृतीचे फलक बसविण्यात येणार आहेत.बिबट्या दिसल्यास नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये, याबाबतची माहिती दिली जाणार असल्याचेही वन विभागाने सांगितले.