नवी दिल्ली – माजी केंद्रीय आरोग्य सचिव आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सदस्या प्रीती सुदान यांच्यावर यूपीएससीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. १९८३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या प्रीती सुदान उद्या या पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. सुदान २०२२ पासून यूपीएससी सदस्यपदी आहेत.२ आठवड्यांपूर्वी यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. त्यानंतर सोनी यांच्या जागी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रीती सुदान यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. प्रीती सुदान या आंध्र प्रदेश केडरच्या १९८३ च्या बॅचच्या निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव म्हणून त्यांचा कार्यकाळ जुलै २०२० मध्ये संपला. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाप्रमाणेच प्रीती सुदान यांच्या गाठीशी संरक्षण मंत्रालयात काम करण्याचाही अनुभव आहे. आंध्र प्रदेशमध्ये त्या वित्त, नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन आणि कृषी या खात्यांच्या प्रभारी होत्या. प्रीती सुदान यांनी जागतिक बँकेसाठी सल्लागार म्हणूनही काम केले आहे.
यूपीएससीच्या अध्यक्षपदी प्रीती सुदान यांची नियुक्ती
