मुंबई
युवासेना सचिव दुर्गा भोसले शिंदे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी निधन झाले. त्या अवघ्या ३० वर्षांच्या होत्या. शिवसेना(ठाकरे गट) युवासेनेच्या कर्तुत्वान महिला अशी दुर्गा यांची ख्याती होती. दुर्गा या बुधवारी ठाण्यातील आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या जनआक्रोश मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
ठाण्यात निघालेल्या जनआक्रोश मोर्च्यात दुर्गा या उस्फुर्तपणे घोषणा देत सहकाऱ्यांसोबत चालत होत्या. यावेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची दुःखद वार्ता समजताच युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सर्वांनाचा मोठा धक्का बसला. त्यांच्या मुंबईतील राहत्या घरून गुरुवारी संध्याकाळी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर बाणगंगा स्मशानभूमी, वाळकेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, आमचा एक अत्यंत मेहनती आणि दयाळू युवासैनिक आम्ही आज गमावला. युवासेनेतले हे दु:ख व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. ओम शांती, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी ट्वीटद्वारे दुर्गा यांना श्रद्धांजली वाहिली.