लखनऊ – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी शिवसेना आमदार आणि भाजप नेत्यांसह आज रात्री 7.45 मिनिटांनी विमानाने लखनऊ विमानतळावर पोहोचले. त्यावेळी त्यांचे हजारो कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजराने आणि प्रभू रामचंद्रांच्या जयजयकाराने विमानतळाचा परिसर दणाणून सोडला. त्यावेळी विमानतळावर उत्तर प्रदेशचे मंत्री देखील उपस्थित होते.
आज दुपारी एकनाथ शिंदे मुंबई विमानतळाहून लखनऊच्या दिशेने विमानाने रवाना झाले. त्यावेळी त्यांच्या पक्षाचे आमदार आणि कार्यकर्त्यांनी विमानतळावर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. लखनऊला जाण्याआधी मुंबई विमानतळावर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, ‘अयोध्या हा आमच्यासाठी भावनिक मुद्दा आहे. अयोध्या आणि राम मंदिर व्हावे, ही बाळासाहेब ठाकरे आणि कोट्यवधी रामभक्तांची इच्छा आहे. अयोध्येत राम मंदिर बांधले जात आहे, त्यासाठी मी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानू इच्छितो. रात्री 7.45 मिनिटांनी शिंदे आणि त्यांचे आमदार लखनऊ विमानतळावर पोहोचताच कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या गजरात एकच जल्लोष केला. संपूर्ण विमानतळाचा परिसर घोषणा आणि ढोलताशाच्या आवाजाने भारून गेला होता. हे वातावरण पाहून शिंदे आणि त्यांचे आमदार भारावून गेले. त्यावेळी शिंदे म्हणाले की, ‘लखनऊ ते अयोध्या श्रद्धेचे वातावरण तयार झाले आहे. प्रभू रामचंद्राच्या चरणी मी नतमस्तक होतो. अयोध्या आमच्यासाठी श्रद्धेचा, भावनेचा विषय आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा येथे आलो आहे. रामभक्तांनी भगवे हिंदुत्वाचे वातावरण बनले आहे. मी कार्यकर्त्यांचे आभार मानतो. प्रभू रामचंद्रांच्या आशिवार्दाने आम्ही सरकार स्थापन केले. 2019मध्ये आमची चूक झाली होती. आता लोकांच्या मनातले सरकार स्थापन केले आहे. मात्र अयोध्येत आम्ही राजकारण आणणार नाही. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावेळी झालेल्या ऑपरेशन गुवाहाटीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संजय कुटे यांनी पडद्यामागची प्रमुख भूमिका बजावली होती. संजय कुटेंसह भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन लखनऊमध्ये शिंदेंसोबत पोहोचले. काल लखनऊमध्ये मुक्काम केल्यानंतर रविवारी एकनाथ शिंदे हे अयोध्येतील प्रभू रामांचे दर्शन घेणार आहेत.
युपीच्या भाजप मंत्र्यांच्या उपस्थितीत
लखनऊत एकनाथ शिंदेंचे जंगी स्वागत
