कंपाला – युगांडाचे विरोधी पक्ष नेते बॉबी वाईन हे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांच्या नॅशनल युनिटी प्लॅटफॉर्म या पक्षाने आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये ही माहिती दिली.युगांडाची राजधानी कंपालाच्या जवळ असलेल्या बुलींडो वाकीसो या जिल्ह्यात पोलिसांनी त्यांच्या पायावर गोळी मारली. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
बॉबी हे आपल्या कारमधून उतरल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांना गराडा घातला. यावेळी असलेल्या पोलिसांबरोबर त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्यांचा पायाला लागली. समर्थकांनी त्यांना गाडीतून रुग्णालयात नेले. बॉबी वाईन हे पूर्वाश्रमीचे गायक असून ते तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. युगांडाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवनी यांचे ते कट्टर विरोधक आहेत. त्यांच्या पक्षाने २०१७ सालच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. तरी त्यांना सत्ता मिळवता आली नव्हती. युगांडाला १९६२ साली ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून इथे एकदाही शांततामय पद्धतीने सत्तांतर झालेले नाही. सध्या राष्ट्राध्यक्षपदावर असलेले मुसेवनी हे गेल्या ४० वर्षांपासून सत्तेत असून आपली सत्ता कायम राहावी यासाठी त्यांनी युगांडाच्या घटनेतील वयोमर्यादा वाढवण्याचा कायदाही संमत करुन घेतला होता. बॉबी वाईन यांना ठार करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.