मॉस्को – युक्रेनला कोणी आण्विक अस्त्रे दिल्यास युक्रेनविरोधात आमच्याकडे असतील ती सर्व शस्त्रे वापरू असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडन पदावरुन पायउतार होण्याआधी युक्रेनला आण्विक शस्त्रे देण्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर पुतिन यांनी कझाकिस्तान इथे बोलताना हा इशारा दिला.
पुतिन यांनी यावेळी म्हटले आहे की, ज्या देशाविरोधात आमचा संघर्ष सुरु आहे. त्या देशाला जर कोणी आण्विक अस्त्रे पुरवणार असेल तर त्या देशाला नेस्तनाबूत करण्यासाठी आम्ही आमच्याकडील सर्व शस्त्रास्त्रे वापरण्यास मोकळे आहोत. युक्रेन स्वतः अशा प्रकारची शस्त्रे तयार करु शकत नाही. त्यांना अधिकृतपणे जर कोणी ही शस्त्रे देत असेल तर तो आंतरराष्ट्रीय कराराचा भंग आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणाऱ्यांच्या विरोधात रशिया आपले नवीन ओरेशनिक हायपरसोनिक क्षेपणास्त्र वापरेल.
रशियाने गेल्या आठवड्यातच युक्रेनवर ओरशनिक हायपरसोनिक क्षेपणास्त्र डागले होते. ३३ महिन्यांच्या या युद्धात रशियाने आतापर्यंत युक्रेनच्या संसदेवर किंवा युक्रेनच्या मंत्र्यांच्या घरावर हल्ले केले नाहीत. त्यामुळे युक्रेनमधील निर्णय घेणाऱ्यांनाच हा थेट इशारा आहे. अमेरिकेला छुपे इशारे देत असतानाच पुतिन यांनी ट्रम्प यांचे कौतुक केले आहे. अमेरिकेत त्यांच्याविरोधात ज्या पद्धतीने प्रचार करण्यात आला त्यामुळे ट्रम्प फार सुरक्षित आहेत, असे मला वाटत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.