पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्याच्या पूरस्थितीची पाहणी घेतल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा शिंदे सरकारवर हल्लाबोल केला . ते म्हणाले की , पुण्यात मुसळधार पाऊस पडल्याने पूर आला, नागरिकांच्या घरात पाणी शिरले. सरकार आणि महापालिकेकडे शहर नियोजन नाही. राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत. एक उपमुख्यमंत्री पुण्याचेच आहेत. तरीही पुण्यात ही स्थिती आहे . याला सरकार चालवणे म्हणतात का ? अजित पवार पुण्यात नसताना धरणातील पाणी कसे सोडले असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.
आज राज ठाकरे यांनी पुण्याच्या मनसे कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की खडकवासला धरणातून पाण्याचा अधिक विसर्ग सोडण्यात आल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगत महापालिकेतील एका अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले. मात्र या परिस्थितीला सर्वचजण जबाबदार आहेत. सध्या प्रशासनाकडे जबाबदारी असल्याने प्रशासन जबाबदार आहे. अधिकाऱ्यांचे निलंबन करून प्रश्न सुटणार नाही. बाहेरुन येणाऱ्यांना फुकट घरे दिली जातात आणि इथल्या लोकांना बेघर केले जाते. दिसली जमीन की विक, असे चालू आहे. हितसंबंध आहेत. एक पुणे नाही तर पुण्यात पाच पाच शहर झाली आहेत. राज्य सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना स्वतः लक्ष घालावे लागणार आहे. कोणताही प्रकल्प आणताना सर्वांना विचारात घेतले जात नाही असे ठाकरे म्हणाले.
शरद पवार यांनी महाराष्ट्राचा मणिपूर होईल, असे विधान केले. यावर बोलताना ते म्हणाले की त्यांचे वकितव्य मी ऐकले नाही, पण पवारांनी याला हातभार लावू नये. महाराष्ट्रात जे काही आता सुरू आहे ती दुर्दैवाची गोष्ट आहे. फक्त मतांसाठी मने दुषित केली जात आहेत, हे चांगले लक्षण नाही. राजकारण्यांनी याबद्दल विचार केला पाहिजे. आपसातील मतभेद बाजूला ठेवून, जातीपातीचे विष कालवून जर मत मिळणार असेल तर महाराष्ट्राचे भविष्य चांगले नाही, असे राज ठाकरे म्हणाले.