उरण- यशश्री शिंदे हत्येचे प्रकरण उरण तालुक्यात वातावरण तापले असताना आज सकाळी यशश्री शिंदेचा पोस्टमॉर्टेम अहवाल उघड झाला. यशश्री शिंदेवर कोणतेही अत्याचार झाले नसून आरोपी मोहम्मद दाऊद शेखने हत्येच्या उद्देशानेच तिच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी महिला आयोगाने दखल घेतली असून आयोगाने पोलिसांकडून याप्रकरणाचा संपूर्ण अहवाल मागितला आहे.
या प्रकरणाचील आरोपी मोहम्मद दाऊद शेख अजूनही फरार आहे. जोपर्यंत आरोपीला पकडत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, अशी भूमिका घेतलेल्या नागरिकांची पोलीस आणि यशश्री शिंदे यांच्या कुटुंबीयांनी समजूत काढल्यानंतर आज शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उरण शहरातील एन आय स्कूलच्या जवळील घरात राहणाऱ्या यशश्री शिंदेची कोटनाका पेट्रोल पंपाजवळ नेऊन तिची हत्या झाली. या हत्येची माहिती शनिवारी पहाटे मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला. यशश्री शिंदेच्या हत्येची घटना समजल्यानंतर शनिवारी उरणमधील बाजारपेठ बंद करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी पुन्हा हत्येचा निषेध म्हणून उरणकरांनी मोर्चा काढून उरण बाजारपेठ बंद ठेवली होती.