यवतमाळ- गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ शहरालगतच्या जंगलात पट्टेदार वाघ फिरतो आहे.वन विभागाच्या कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाला आहे. त्यामुळे यवतमाळकरांची चिंता वाढली आहे.
शहरालगत चारही बाजूंनी जंगल आहे. याठिकाणी वाघाचे वास्तव्य असल्याची चर्चा नेहमीच होत असते. त्यातच गेल्या आठवड्यात घाटंजी मार्गावर असलेल्या बोधगव्हाण शिवारात पट्टेदार वाघाने एका गाईवर हल्ला केला.या भागात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. वन विभागाच्या कॅमेऱ्यातही हा वाघ कैद झाला. त्यामुळे यवतमाळ शहरालगतच्या जंगलात वाघाचे वास्तव्य असण्यावर शिक्कामोर्तब झाले.प्रदीप पिंपळकर या शेतकऱ्याची गाय शिवारात चरत असताना वाघाने तिच्यावर हल्ला केला.गाय संकटात असल्याने जोराने हंबरू लागली. शेतकरी धावत आल्यानंतर वाघ गायीवर हल्ला करत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोकही जमा झाले. सर्वांनी आरडाओरड केल्याने वाघ शिकार सोडून पळून गेल्याने गाय बचावली.या हल्ल्यात गाईच्या शरीरावर वाघाच्या पंजाचे ओरखडे पडले आहे. शिवारात वाघ असल्याची बातमी सर्वत्र पसरल्यानंतर बोधगव्हाण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.