नवी दिल्ली- यमुना नदी स्वच्छता कामातील ८५० कोटी रुपयांचा घोटाळा दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी अनोख्या पद्धतीने सिद्ध केला आहे. त्यांनी आज यमुना नदीत डुबकी मारल्यानंतर त्यांच्या सर्वांगाला खाज सुटली व श्वास घेण्यात अडचण आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती भाजपाने एक्स वर दिली आहे.दिवाळीनंतर साजऱ्या होणाऱ्या छठ पर्वाच्या निमित्ताने आम आदमी पार्टी व भाजपा यांच्यात यमुना नदीतील प्रदूषणावरुन आरोप प्रत्यारोप झाले होते. दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केजरीवाल यांना यमुनेत आंघोळ करण्याचे आव्हान दिले होते. केजरीवाल यांनी यमुना स्वच्छ केली नाही हे दाखवण्यासाठी सचदेवा यांनी स्वतः यमुनेत आंघोळ केली, त्यानंतर त्यांना श्वास घेण्यात अडचण आली. त्यामुळे तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्ली भाजपाने त्यांचे उपचार करतांनाचे फोटोही एक्स माध्यमावर प्रसारित केले आहेत. अरविंद केजरीवाल व दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी यमुनेची पाहणी करावी अशी मागणी भाजपाने केली असून त्यांच्यासाठी यमुनेच्या तीरावर एक खुर्चीही ठेवली आहे असे म्हटले आहे.