नवी दिल्ली
१७ नोव्हेंबरपासून छठ पूजा हा चार दिवसीय कार्यक्रम सुरू झाला. याअंतर्गत काल सायंकाळी नद्या आणि तलावाच्या पाण्यात प्रवेश करून मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यात आले. यासाठी काल दिल्लीमध्ये भाविकांसाठी १००० हून अधिक घाट तयार करण्यात आले होते. मात्र, यमुना नदीचा पांढरा फेस अद्याप साफ झाला नाही. शनिवारीही यमुनेत पांढरा फेस दिसून आला, त्यामुळे छठ व्रताच्या पूजेत अडचणी आल्या. यमुनेचा पांढरा फेस काढण्यासाठी सरकारने शुक्रवारी रसायनांची फवारणीही केली, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. या फेसाजवळ येताच डोळ्यांची जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास सुरू होतो.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) एका अहवालात सांगितले की, यमुना नदीची लांबी १३०० किमीपेक्षा जास्त आहे.यातील वजिराबाद ते दिल्लीतील कालिंदी कुंज हे अंतर केवळ २२ किलोमीटर आहे. यमुनेचे ७६ टक्के प्रदूषण याच भागात होते. यमुना नदीत पावसाळा वगळता जवळपास वर्षभर गोडे पाणी नसते. यमुना नदीतील फॉस्फेट आणि नायट्रेटमध्ये वाढ होत आहे. वाढत्या थंडीमुळे अत्यावश्यक ऑक्सिजन तयार करण्याची प्रक्रिया मंदावली आहे. छठ उपवासासाठी, यमुनेमध्ये अधिक पाणी सोडले जाते, ज्यामध्ये फॉस्फेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे फेस तयार होतो. तसेच घरे आणि कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे फेस तयार होतो.