मुंबई –
जून ते सप्टेंबर या कालावधीत समुद्राला उधाण येणार असून २५ दिवस धोक्याचे असणार आहेत. यादरम्यान मुंबईत पाणी साचण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास एनडीआरएफसह इतर यंत्रणाही तैनात केल्या जाणार आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे ४ ते ८ जून रोजी सलग पाच दिवस समुद्रात ४.५१ ते ४.६९ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जुलैमध्येही सहा दिवस समुद्रात हायटाईड येणार असून ४.७७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. जुलै महिन्यात जास्त पाऊस पडल्यास सखल भागांत मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता असते. त्यामुळे या वेळची स्थिती आव्हानात्मक असणार आहे. याला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सलग सहा दिवस आणि महिना अखेरीस ऑगस्टला हायटाईड असणार आहेत. या वेळी ४.८७ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवातीचे तीन व महिनाअखेरीस तीन दिवस असे सहा दिवस समुद्रात लाटा उसळणार असल्याने सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.