कोट्यावधी रुपयांच्या
घोटाळ्याची शंका
मुंबई- म्हाडाच्या मास्टर लिस्टमध्ये म्हणजेच बृहतसूचीमध्ये पात्र ठरलेले ५६ अर्जदार फेरपडताळणीमध्ये कागदपत्रे सादर करू शकले नाहीत.त्यामुळे या अर्जदारांना म्हाडाने अपात्र ठरविले आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे.त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी म्हाडातील काही वरिष्ठ अधिकारी करत आहेत.
ज्या भूखंडाचा पुनर्विकास होत नाही किंवा होऊ शकत नाही अशा इमारतीमधील रहिवाशांना घर देणे म्हाडाला बंधनकारक असते. अशा रहिवाशांना घरे देण्यासाठी म्हाडा मास्टर लिस्ट तयार करते. दक्षिण मुंबईतील अशाच धोकादायक उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांना मास्टर लिस्टच्या माध्यमातून घरे दिली जाणार होती. त्यासाठी म्हाडाने या रहिवाशांना घरे देण्यासाठी नागरिकांकडून अर्ज मागविले होते.या अर्जांची पात्रता निश्चिती झाल्यानंतर २६५ पात्र रहिवाशांना घरे देण्यासाठी २८ डिसेंबर २०२३ रोजी म्हाडाने लॉटरी काढली होती.मात्र लॉटरीतील अर्जदारांच्या कागदपत्रांची फेरपडताळणी करण्याची मागणी झाल्याने पुन्हा कागदपत्रे मागविण्यात आली.त्यावेळी मात्र ५६ अर्जदार आपली कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले,अशी माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.दरम्यान,या अपात्र अर्जदारांच्या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.त्याच्या चौकशीची मागणी म्हाडाचे काही वरिष्ठ अधिकारीच करत आहेत.