मुंबई- म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील सोडतीमधील पात्र मूळ भाडेकरूंच्या निकटच्या वारसांना घराचा सशर्त ताबा देण्याचा निर्णय म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी जाहीर केला. घराची ताबा पावती दिल्यापासून सहा महिन्यांच्या आत हे वारस प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.या निर्णयामुळे मूळ भाडेकरूंच्या वारसांना मोठा दिलासा मिळाला आहे.
म्हाडाच्या मास्टर लिस्ट मधील २६५ पात्र भाडेकरू रहिवाशांना सदनिकांचे वाटप करण्यासाठी लॉटरी काढण्यात आली होती.यातील अनेक पात्र मूळ भाडेकरू हयात नसल्यामुळे घराचा ताबा घेण्यापूर्वी वारस प्रमाणपत्र सादर करा,असे निर्देश म्हाडाने त्यांच्या वारसांना दिले होते. मात्र वारस प्रमाणपत्रासाठी सहा ते नऊ महिने लागत असल्याने हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी वारसांना धावाधाव करावी लागत होती. त्यामुळे अनेकांचे घराचा ताबा घेण्याचे स्वप्न रखडले होते.पण आता घराच्या ताबा घेऊन पुढील सहा महिन्यांत वारस प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे मूळ भाडेकरूंच्या वारसांना घराचा ताबा मिळणार आहे.