नवी दिल्ली – दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नवी मेसेज ट्रेसिबिलिटी प्रणाली लागू करण्यासाठीची मुदत आज पुन्हा एकदा वाढवून दिली. त्यामुळे मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.
टेलिमार्केटिंग कंपन्या आणि बल्क मेसेजच्या माध्यामातून आपल्या उत्पादनांची किंवा सेवांची जाहिरात करणाऱ्या कंपन्यांना मेसेज ट्रेसेबिलिटी प्रणालीशी सुसंगत असणे ट्रायने अनिवार्य केले आहे. ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर येणाऱ्या मेसेजचा स्रोत माहीत करून घेता यावा यासाठी ट्रायने ही नवी प्रणाली लागू करणे अनिवार्य केले आहे. ऑनलाईन फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण व्हावे हा या प्रणालीचा उद्देश आहे.
ट्रायने पहिल्यांदा ही प्रणाली १ नोव्हेंबरपासून लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र मोबाईल कंपन्यांनी ही प्रणाली लागू करण्यातील अडचणी दाखवून देताच ही मुदत १ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली.आज पुन्हा मुदतवाढ देत १० डिसेंबरपासून प्रणाली लागू करण्याची सूचना ट्रायने केली आहे.