नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबरला 74 पूर्ण करून वयाच्या 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. मोदी सरकार सत्तेवर असतानाच भाजपाने पक्षाच्या घटनेत बदल करून भाजपात 75 व्या वर्षी नेत्यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळेच मोदी निवृत्त होणार का? पुढची निवडणूक लढणार का? ही चर्चा सुरू झाली. त्यातच पंतप्रधान पदाचे खंबीर दावेदार नितीन गडकरी यांनी आत्ताच गौप्यस्फोट करीत म्हटले की, मी पंतप्रधान झालो तर ते मला पाठिंबा देतील असे विरोधी पक्षातील एका बड्या नेत्याने मला सांगितले होते. गडकरींनी हे वक्तव्य करून पंतप्रधान पदाची इच्छाच व्यक्त केली अशी चर्चा आहे.
काल नागपूरमध्ये झालेल्या फिक्कीच्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पूर्ण पाठिंबा देऊ, अशी ऑफर मला विरोधी पक्षातील एका बड्या नेत्याने लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी दिली होती. पण मी ती ऑफर धुडकावून लावली. माझी मूल्य आणि माझ्या पक्षाशी मी प्रामाणिक आहे. पंतप्रधानपद मिळविणे हे कधीही माझे ध्येय नव्हते आणि आजही नाही. मी आजवर कोणत्याही पदासाठी तडजोडी केल्या नाहीत. भविष्यातही करणार नाही. मला पंतप्रधानपदाची आकांक्षाच नाही तर त्या पदासाठी मी तडजोड कशासाठी करायची, कोणाचा पाठिंबा का घ्यायचा,असे माझे मन म्हणते, असे गडकरी म्हणाले.
गडकरी यांनी पंतप्रधान पदात रस नाही असे म्हटले असले तरी त्याबाबत गौप्यस्फोट करण्यासाठी त्यांनी साधलेल्या टायमिंगमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मोदी 17 सप्टेंबर रोजी वयाची 74 वर्षे पूर्ण करीत असल्यामुळे पक्षाच्या नव्या घटनेनुसार त्यांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारली पाहिजे. पण मोदी तसे करणार नाहीत,असे बोलले जाते. तरीही मोदींच्या नंतर भाजपाचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण याची चर्चा होतच आहे. मोदींप्रमाणेच आक्रमक असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते बांधकाम खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांची नावे वारंवार या पदासाठी चर्चेत असतात.या चार नेत्यांपैकी योगी आणि अमित शहा हे आक्रमक, तर राजनाथ सिंह आणि गडकरी हे नेमस्त, सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते मानले जातात. गडकरी यांच्या नावावर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांची सहमती होऊ शकते. भाजपाचे अध्यक्ष राहिल्याने गडकरी यांना केंद्रीय स्तरावरही अनेक राज्यांतील प्रमुख प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा मिळू शकतो. शिवाय गडकरी हे संघाच्या मर्जीतील नेते आहेत. त्यामुळे त्यांचे पारडे जड आहे. याची जाण असल्यानेच गडकरी यांनी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी हा गौप्यस्फोट करून अप्रत्यक्षपणे पंतप्रधानपदाची इच्छा व्यक्त केली आहे,असे राजकीय जाणकार मानतात.
दरम्यान, गडकरी यांना त्यांच्या या वक्तव्याबद्दल आज प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलते करण्याचा प्रयत्न केला असता गडकरी त्यांच्या प्रश्नांना उत्तर न देता निघून गेले. मात्र दिवसभर त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच होती.
हुकूमशाहीशी तडजोड करू नका
खा. संजय राऊतांची प्रतिक्रिया
गडकरी यांच्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले की, नितीन गडकरी हे भाजपातील एक सर्वमान्य असे नेते आहेत. पंतप्रधानपदासाठी तडजोड करा असे त्यांना कुणी सांगितले असेल असे मला वाटत नाही. देशात सध्या जी हुकूमशाही, एकाधिकारशाही सुरू आहे, आणीबाणी लादण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्याशी तडजोड करू नका अशी भूमिका विरोधी पक्षातील नेत्याने त्यांच्याकडे मांडली असावी. तसे असेल तर त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. सरकारमध्ये बसून देशाच्या मुल्यांशी तडजोड केली जाते तो राष्ट्रीय अपराध आहे असे मी मानतो.