नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विविध भागांचा दौरा करणार आहेत. 24 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या 36 तासांच्या दौऱ्यात ते 5,000हून अधिक किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. या दौऱ्यात ते सात वेगवेगळ्या शहरांना भेट देऊन आठ कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान 24 एप्रिलला सकाळी प्रवास सुरू करतील. ते प्रथम दिल्ली ते खजुराहो असा 280 किलोमीटरचा प्रवास करतील. खजुराहोपासून ते रीवा प्रवास करतील. तिथे ते राष्ट्रीय पंचायत राज दिन कार्यक्रमात सहभागी होतील. मध्य प्रदेशनंतर ते 1700 किलोमीटरचा प्रवास करून केरळमध्ये कोचीला पोहोचतील. तिथे युवम कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होतील. कोचीहून थिरुअनंतपूरम येथे रवाना होतील. हा प्रवास 190 किलोमीटरचा असेल. तिथे ते वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील, त्यांचा पुढचा प्रवास पश्चिम भारतात सुरत मार्गे सिल्व्हासाला होणार आहे. हे अंतर 1,750 किलोमीटरचे आहे. तिथे नमो मेडिकल कॉलेजला भेट देतील. तसेच वेगवेगळ्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील. तिथून मोदी देवका सीफ्रंटच्या उद्घाटनासाठी दमणला जातील. तिथून पुन्हा सूरतमार्गे दिल्लीला जातील. हा प्रवास 940 किलोमीटरचा असेल. मोदी यांचा एकूण प्रवास 5,300 किलोमीटरचा असेल.
मोदींचा लांबलचक प्रवास 36 तासांत 5 हजार किमी
