नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पत्नी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये एक महागडा हिरा भेट दिला होता. 20,000 डॉलर्स म्हणजे 17 लाख रुपये किमतीचा हा हिरा ही 2023 मध्ये बायडन दाम्पत्याला मिळालेली सर्वात महागडी गिफ्ट होती,अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने दिली आहे. विशेष म्हणजे, भारत सरकारने माहिती अधिकार कार्यकर्त्याला मोदींनी दिलेल्या भेटवस्तूंची किंमत सांगण्यास विरोध केला होता. नेमकी तीच माहिती अमेरिकेच्या सरकारने आता जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर 2023 मध्ये क्वाड शिखर परिषदेसाठी तीन दिवसांच्या अमेरिका दौर्यावर गेले होते. या दौर्यात मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना उत्कृष्ट कलाकुसर असलेल्या चंदनाच्या लाकडी पेटीत गणेशाची चांदीची मूर्ती दिली होती. ही चंदनाची पेटी जयपूरच्या कारागिरांनी, तर चांदीची गणेश मूर्ती कोलकाताच्या कारागिरांनी बनवली होती. मोदी यांनी बायडन यांच्या पत्नी जिल बायडन यांनाही साडेसात कॅरेटचा हिरा भेटीदाखल दिला होता. हा हिरा कार-ए-कलमदानी या प्रसिद्ध काश्मिरी पेपर बॉक्समधून देण्यात आला होता. तो इको-फ्रेंडली हिरा होता, असे त्याचे वैशिष्ट्य होते. याच हिर्याची किंमत सुमारे 20 हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे 17 लाख रुपये आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने नुकतेच जाहीर केले आहे.
मोदी यांनी जिल बायडन यांना दिलेल्या या हिर्याची किंमत किती, अशी विचारणा भारतातील अजय बासुदेब बोस नामक माहिती अधिकार कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकाराखाली केली होती. 7 सप्टेंबर 2023 रोजी त्यांनी माहिती अधिकाराखाली रितसर अर्ज करून ही माहिती मागितली होती. बोस यांच्या पत्राला परराष्ट्र खात्याने 13 सप्टेंबर 2023 रोजी उत्तर दिले. ही माहिती उघड केल्याने भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांवर विपरित परिणाम होऊ शकतो, असे कारण देत परराष्ट्र खात्याने बोस यांना माहिती देण्यास असमर्थता व्यक्त केली होती.
अमेरिकेने या हिर्याची किंमत उघड केल्यानंतर भारतीय परराष्ट्र खात्याने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु जिल बायडन यांना पंतप्रधान मोदी यांनी दिलेला हिरा हा नैसर्गिक हिरा नसून तो प्रयोगशाळेत तयार केलेला कृत्रिम हिरा (लॅब ग्रोन डायमंड) आहे. ज्याची किंमत खर्या हिर्याच्या तुलनेत खूप कमी असते. कृत्रिम हिरे बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया पर्यावरणस्नेही असते. या प्रक्रियेमध्ये सौर आणि पवन ऊर्जा अशा पर्यावरणस्नेही ऊर्जास्रोतांचा वापर केला जातो. प्रक्रियेमध्ये प्रति कॅरेट 0.028 एवढे अत्यल्प कार्बन उत्सर्जन होते, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी
दिली आहे.
अमेरिकेत सहसा राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबियांकडून मिळालेल्या भेटवस्तू स्वतःकडे ठेवतात. पण खूप महागड्या (480 डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या) भेटवस्तू यूएस नॅशनल आर्काइव्हमध्ये किंवा व्हाईट हाऊसमध्ये प्रदर्शनासाठी ठेवल्या जातात. त्यामुळे हा हिराही प्रदर्शनात वा संग्रहालयात ठेवला जाण्याची शक्यता आहे.