नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय हवामान तज्ज्ञांनी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तर भारतीय हवामान खात्याने याच आठवड्यात चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील आग्नेयेला ९ मेपर्यंत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ मध्य बंगाल उपसागराच्या दिशेने उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. ६ मे रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आज विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मोचा हे २०२३ मधील पहिले चक्रीवादळ असणार आहे. भारतीय हवामान विभागानुसार काही माॅडेल्समध्ये डिप्रेशनचे पुढे चक्रीवादळात रूपांतर होत असल्याचे दाखवत आहे. बंगालच्या उपसागरात होत असलेल्या घडामोडींवर हवामान विभागाने नजर ठेऊन आहे. मोचा चक्रीवादळ बंगलादेशच्या किनारपट्टीला ११ ते १५ मे दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने येत्या पाच दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचे आवाहन मच्छिमारांना केले आहे. हे चक्रीवादळ ४०ते ५० किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्यचा अंदाज आहे.