अहमदाबाद
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल झालेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात क्रिकेटपटू विराट कोहलीला एका पॅलेस्टिनी समर्थक तरुणाने मिठी मारली. वेन जॉन्सन असे या तरुणाचे नाव असून, तो ऑस्ट्रेलियाचा रहिवासी आहे. या तरुणाला खलिस्तानी दहशदवादी संघटनेने १० हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले. दरम्यान, या तरुणाविरोधात चांदखेडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात काल भारताची फलंदाजी सुरू असताना हा तरुण मैदानात घुसला. त्याच्या टी-शर्टवर ‘फ्री पॅलेस्टाईन’ असे लिहिले होते. त्याने विराटला मागून पकडले. या प्रकरणी जॉन्सन म्हणाला की, मी ऑस्ट्रेलियाचा आहे. विराट कोहलीला भेटण्यासाठी मी मैदानावर आलो होतो. हा पॅलेस्टाईनमधील युद्धाचा निषेध आहे.
यात प्रतिबंधित खलिस्तानी दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिसने उडी घेत संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने या तरुणाला बक्षीस जाहीर केले. पन्नू म्हणाला की, मैदानात घुसून जॉन्सनने गाझा आणि पॅलेस्टाईनबाबत भारताची भूमिका उघड केली आहे. यासाठी आम्ही जॉन्सनला १० हजार डॉलरचे बक्षीस देणार आहोत. आम्ही जॉन्सनच्या पाठीशी आहोत. यावेळी पन्नूने खलिस्तान आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली.