मुंबई –
देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे. कोरोना नियमांकडे लोकांचे दुर्लक्ष आणि केंद्र सरकारकडून वेळेवर न होणारा लसीचा पुरवठा यामुळे तर मे महिन्यापर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच राहणार आहे,असा इशारा राष्ट्रीय टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सुभाष साळुंखे यांनी दिला आहे.
मुंबईसह राज्यात आलेल्या तीनही लाटा नियंत्रणात आणण्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारला यश आले. मात्र गेल्या महिन्यापासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागले असून त्यात सहव्याधी रुग्णांची संख्या मोठी आहे. तसेच लसीकरण आणि कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यातून निर्माण झालेली नैसर्गिक रोगप्रतिकारक आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्यामुळे दोन लसींसह बुस्टर डोस घेतलेल्या सहव्याधी आणि ज्येष्ठांच्या जीवाला धोका जास्त आहे, असे डॉ.साळुंखे यांनी सांगितले.
डॉ.साळुंखे असेही म्हणाले की, सध्या देशात मोठ्या प्रमाणात लसींचा तुटवडा आहे. उपलब्कोध लशींमध्ये कोरोनाच्या सध्याच्या उपप्रकाराला दाद देण्याची क्षमता आहे की नाही, याबाबत स्पष्टता नाही. उपलब्ध लसींना अधिक सक्षम केले पाहिजे आणि या बदल केलेल्या लसी तातडीने लोकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर जनुकीय चाचण्यांसाठी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांच्या चाचण्या तातडीने करून त्यांचे अहवालही तातडीने राज्यांकडे पाठवले पाहिजेत. त्यामुळे राज्यांना तातडीने उपचारांबद्दल निर्णय घेणे शक्य होणार आहे. मात्र, हे काम खूप धीम्या गतीने सुरू आहे.