अमरावती – मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसालनजीक जंगलात आज सकाळी लाकडे तोडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. यामध्ये या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली.
हरीराम गंगाराम धिकार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हरीराम हा गावकऱ्यांसोबत जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेला होता. हरीसालपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर जंगलात अचानकपणे वाघाने हरीरामवर हल्ला केला. त्यानंतर वाघाने त्याला ओढत दूरवर नेले. त्याच्यासोबत असलेले ग्रामस्थ आपला जीव वाचवून गावात पळाले. त्यांनी ही माहिती गावातील लोकांना दिली. त्यांनी जंगलाकडे धाव घेतली. आमदार राजकुमार पटेल हे देखील घटनास्थळी पोहचले. त्यांच्यासमवेत सरपंच विजय दारसिंबे, उपसरपंच गणपत गायन होते. त्यानंतर जंगलात शोधाशोध केल्यानंतर हरीराम यांचा मृतदेह सापडला.