नवी दिल्ली- २३ वर्ष जुन्या मानहानी प्रकरणी दिल्लीतील सत्र न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या ५ महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यासोबत न्यायालयाने त्यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. याप्रकरणी न्यायालयाने दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांना नोटीस बजावून ४ सप्टेंबरपर्यंत उत्तर मागितले आहे.
१ जुलै रोजी कनिष्ठ न्यायालयाने मेधा पाटकर यांना ५ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि त्यांना व्हीके सक्सेना यांना १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते. मेधा पाटकर यांनी या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले. त्यावर आज सत्र न्यायालयात सुनावणी झाली आणि या न्यायालयाने मेधा पाटकर यांना दिलासा देत शिक्षेला स्थगिती दिली.