मुंबई- मुंबईसह उपनगरात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मागील अनेक वर्षांपासून प्रचंड वाढ होत आहे.त्यामुळे लोकलमधील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मुंबईत मोनो, मेट्रो या वाहतूक व्यवस्थेचे जाळे विणले जात आहे.या मोनो आणि मेट्रोमधून प्रवाशांना जाण्यास परवानगी आहे.मात्र, डबेवाल्यांना नाही,त्यामुळे डबेवाल्यांना मोनो आणि मेट्रोतून डबे नेता यावे यासाठी या दोन्ही प्रकारच्या गाड्यांमध्ये स्वतंत्र जागेची व्यवस्था करावी, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
सुभाष तळेकर यांनी सांगितले की,मेट्रो आणि मोनो रेलच्या गाड्यांमध्ये सामानाचा आकार आणि वजन यासंदर्भात असलेले नियम फारच अडचणीचे आहेत.त्यामुळे आम्हा डबेवाल्यांना जेवणाच्या डब्यांची वाहतूक करणे कठीण झाले आहे.ही गैरसोय केवळ डबेवाल्यांपुरती मर्यादित नाही तर कामगार वर्गालाही या नियमाची झळ पोहचत आहे. त्यामुळे मेट्रो आणि मोनोरेलमधून डबे नेण्यासाठी डबेवाल्यांना स्वतंत्र जागेची सोय केली जावी.