सांगली – वायू गळतीमुळे तीन कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कडेगाव तालुक्यातील शाळगाव येथील मॅनमार फर्टिलायझर कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाने सील ठोकले. केमिकलची सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट लावून ही कंपनी पूर्ण बंद करावी,असे मंडळाने आपल्या आदेशात म्हटले आहे.विभागीय अधिकारी जे.एस.हजारे यांनी आदेश काढले आहेत.
या दुर्घटनेनंतर केलेल्या तपासणीत कंपनीने औद्योगिक सुरक्षा मान्यता घेतली नव्हती,असे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे.त्याची स्वतंत्र चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. केमिकलचा प्रभाव कायम असल्याने काल सकाळी पथकाने पुन्हा पाहणी केली. त्यानंतर ही कार्यवाही केल्याचे उपप्रादेशिक अधिकारी किल्लेदार यांनी सांगितले.दरम्यान,या दुर्घटनेत सुचिता राजेश उथळे (४५),नीलम मारुती रेठरेकर (३५) आणि किशोर तात्यासो सापकर (४०) यांचा मृत्यू झाला. तर जण गंभीर असून त्यांच्यावर कराड येथे उपचार सुरू आहेत.