मुंबई – मुंबई महापालिका मुलुंडमध्ये लवकरच अद्ययावत आणि भव्य पक्षी उद्यान उभारणार असून याठिकाणी तब्बल १८ प्रजातींच्या २०६ पक्ष्यांचा किलबिलाट मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. उद्यानाच्या उभारणीसंदर्भात पालिकेने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणास तपशीलवार आराखडा सादर केला आहे. या पक्षी उद्यानात आशियाई, आफ्रिकी,ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथील पक्ष्यांची क्षेत्रवार विभागणी असणार आहे.
मुलुंडमध्ये उभारले जाणारे पक्षी उद्यान हे भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचे उपकेंद्र असणार आहे. मुलुंड (पश्चिम) येथील भूखंड क्रमांक ७०६ ब/ड आणि ७१२/अ वर हे पक्षी उद्यान उभारण्यात येणार असून याचे क्षेत्रफळ १७ हजार ९५८ चौरस मीटर आहे. पक्षीगृहासाठी १० हजार ८५९ चौरस मीटर आणि खेळांसाठी ३ हजार ७२८ चौरस मीटर क्षेत्र या उद्यानात राखीव असणार आहे. या पक्षी उद्यानात रेड ब्रेस्टेड पॅराकीट, ब्लॉसम हेडेड पॅराकिट, व्हाईट पिकॉक, मलबार ग्रे हॉर्नबिल, ब्लॅक हंस, ब्लॅक मुनिया, कोकाटू गालाह, ओस्ट्रिच, स्कॉलेट या काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या दुर्मिळ १८ प्रजातींचे २०६ पक्षी येथे पाहता येणार आहेत. याशिवाय संवाद,कार्यक्रम, कार्यशाळा,तज्ञांची व्याख्याने पक्षीगृहात प्रवेश करण्यापूर्वी मोठ्या धबधब्यासह येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्याची पालिकेची योजना आहे. या पक्षी उद्यानात संवादात्मक कार्यक्रम, कार्यशाळा आणि पक्षी तज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातील.