मुरूड जंजिरा- मुरूड तालुक्यात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. होळी सणासाठी कोरोना मुक्त वातावरण असल्याने मुंबई, पुण्यातून चाकरमानी आले आहेत. सलग सुट्टी असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात शनिवार पासून तालुक्यात दाखल झाले आहेत. हॉटेल्स, लॉजिंग बुक होत आहेत. काशीद बीचवर देखील पर्यटकांची वर्दळ आहे अशी माहिती लॉजिंग मालक मनोहर बैले, यांनी दिली.सलग सुट्टीमुळे पर्यटकांची वर्दळ वाढू शकते असा अंदाज काहींनी व्यक्त केला.
होलिकोत्सव हा कोळी बांधवांचा मोठा सण असल्याने मुंबईच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या सर्व नौका राजपुरी, नांदगाव, एकदरा, मुरूड, दिघी आदी बंदरात दाखल झाल्या आहेत. मासळी उत्पादन घटले असल्याने मच्चीमारांच्या हाताशी पैसे कमी आहेत. तरी देखील वेळात वेळ आणि कसेबसे करून पैसे मिळवून होळी साजरी करण्यासाठी कोळी बांधवांच्या नौका पताका, झुली सजवून वाजत गाजत समुद्रात रंगांची उधळण करीत दाखल झाल्या आहेत. मुरूड, एकदरा, बोर्ली खाडीत नांगरलेल्या नौकांची गर्दी झाली असून एकदरा पुलावर मच्चीमारांचा होळीचा आनंद आणि उत्साह पाहण्यासाठी नागरिकांची नोठी गर्दी होत असल्याचे दिसून येते. होळीसाठी सर्व कोळीवाडे सज्ज झाले आहेत. येथील होलिकोत्सव संस्कृती पाहण्यासाठी परदेशी पर्यटक देखील येत असतात. गेले 10 दिवस मुरूड शहर सह गावांतून छोट्या होळयांचे रोज दहन आणि आहुती दिली जाते तर मुख्य होळीच्या दिवशी सर्वजण श्रीफळ अर्पून प्रार्थना केली जाते. नंतर तो प्रसाद म्हणून वाटण्यात येतो.
मुख्य होळी पौर्णिमा दिवशी मुरूडसह विविध गावातून सुपारी अथवा भेंडीच्या काठीचे झाड बाजारनाक्यावर युवक नाचवत आपल्या गावात सायंकाळ पर्यंत वाजत गाजत नेत असतात. मुरूड,राजपुरी, एकदरा, दिघी, बोर्ली, नांदगाव येथील खाडी बंदरात 400 पेक्षा अधिक नौका रविवार पर्यंत दाखल झाल्याची माहिती एकदरा कोळी समाजाचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर आणि नाखवा रोहन निशानदार यांनी दिली.सर्व नौका आकर्षक पध्दतीने सजविण्यात आल्या आहेत.कोळी बांधवांचा होलिकोत्सव डोळे दिपवणारा आहे.
मुरूडमध्ये शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला