मुरूड – मुरूड तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून विभिन्न भागातील भात शेती पाण्याखाली गेली आहे. शुक्रवारी रात्री 8 पासून शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 12 तासात तालुक्यात 95 मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण 1855 मिमी पाऊस पडल्याची माहिती तहसील सूत्रांनी दिली.
अतिवृष्टीमुळे मुरूडजवळील शिघ्रे, खारआंबोली परिसरात असलेली भात शेती जलमय झाली आहे. पारगानयेथील शेतकरी धर्माजी हिरवे यांची खारआंबोली -खतीबखार गावाजवळील भात शेती जलमय होऊन राब वाहून गेले आहेत. नदी उलटल्याने जोरदार पाणी घुसून शेतीचे बांध देखील वाहून गेल्याचे धर्माजी हिरवे यांनी सांगितले. दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्या मुळे शिघ्रे, जोसरांजन, उंडरगाव, गोयगाव, वावडुंगी खारआंबोली, तेलवडे परिसरातील अनेक जणांची शेती पाण्याखाली असून मोठे नुकसान होण्याची शक्यता धर्माजी हिरवे यांनी व्यक्त केली आहे. शेत जमिनीवरील खांडदेखील फुटून पाणी वेगाने घुसून लावलेले राब वाहून गेले आहेत. काही ठिकाणी बांध वाहून गेल्याने आपल्या शेतावर पोहचणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. या गावाजवळ समुद्र खाडी आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस आणि खाडीच्या भरतीचे पाणी आल्याने शेतीला अधिक धोका निर्माण झाला आहे.अनेक शेतकऱ्यांची कामे देखील अर्धवट राहिली आहेत.