मुरूड –
मासळीचा नवा हंगाम सुरू झाला असला तरी मोजक्याच होड्या मासेमारीस गेल्याची माहिती मुरूड आणि राजपुरी येथील कोळी बांधवांनी गुरुवारी बोलताना दिली. वादळीपाऊस असल्याने आगामी दोन दिवसात खवळलेल्या समुद्रातील एकूण वादळी स्थिती पाहूनच मोठया नौका खोल समुद्रात मासेमारीस निघतील असे गुरुवारी सांगण्यात आले आहे.किनाऱ्यावर मच्चीमारीस निघण्याची तयारी आणि लगबग मुरूड किनाऱ्यावर आज दुपारी दिसून आली.
पावसाळी बंदीनंतर पहिल्याच मोसमात मासेमारी छोट्या नौका राजपुरी समुद्रात गेल्या असता बोंबील, कोलंबी, मांदेली, अशी निवडक मासळी त्यांना मिळाली. परंतु मासळीचे गगनाला भिडलेले दर पाहून अनेक जण अवाकच झाले. मुरुड मार्केटमध्ये बोंबील वाटा ४०० रुपयांना मिळत आहे. या व्यतिरिक्त फारशी मासळी मार्केटमध्ये दिसून आली नाही.काही नौका अजूनही पूर्वतयारी करीत असून सर्वच बोटींवर अद्याप खलाशी परतले नसल्यानेदेखील समुद्रास जाण्यास विलंब लागेल, असे मत काही मच्छीमारांनी व्यक्त केले.
५ ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू होत असल्याने त्या आधी मासळी खवय्ये भरपूर मासळीच्या प्रतीक्षेत आहेत.पुढील दोन दिवस मार्केटमध्ये मुबलक आणि स्वस्त बोंबील, कोलंबी, अन्य मासळी उपलब्ध होईल असे संकेत बोर्ली, राजपुरी, एकदरा, मुरूड किनारपट्टीवर मिळत आहेत.राजपुरी येथून बोंबील यायला लागले की दर कमी होतात. बोंबील वाटा ५० रुपयांपर्यंत स्वस्तदेखील होत असतो हा मागील दोन वर्षापासूनचा अनुभव आहे. मासेमारी हंगाम वाया न घालवता पावसाचा अंदाज घेऊन उपलब्ध खलाशी घेऊन मासेमारीस निघणे गरजेचे असल्याने यावर सामूहिक पध्दतीने नौका सोडून उपाययोजना करावी लागेल असे मत जेष्ठ मच्छीमारांनी व्यक्त केले.