रायगड- मुरूड तालुक्यातील भातशेतीचे पीक पूर्ण तयार झाले असून ठिकठिकाणी भातकापणी आणि बांधणीची लगबग सुरू आहे. यंदा भातपीक उत्तम आले असून, शेतकर्यांना मोठा दिलासा मिळेल असे दिसून येत आहे.प्रामुख्याने ‘जया’ आणि ‘चिंटू’ वाणाच्या भात कापणीला शेतकर्यांनी प्रारंभ केला आहे.
मुरुड तालुक्यात साधारणपणे पारंपरिक गरवे,निम गरवे आणि हळवे अशा स्वरुपात भातपिकाची विभागणी केली जाते. यातील वरकस किंवा उखारू जमिनीवरचे हळवे भातपिक याच महिन्यातील परतीच्या पावसामुळे नुकसानीत गेले होते.मात्र आता पावसाची पूर्ण उघडीप दिली आहे.त्यामुळे भाताच्या विविध जातीमधील जया आणि चिंटू या वाणाच्या भातपिकाची कापणी सुरू झाली आहे.दुसरीकडे परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना भरपाई देण्याची मागणी होत आहे. मात्र विमा कंपन्यांच्या काढणी पश्चात नुकसानभरपाई देण्याच्या धोरणामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण या निकषात हा शेतकरी येत नाही. त्यामुळे कोकणात पीक विम्याचे निकष बदलण्याची गरज असल्याचे मत किसान क्रांती राज्य संघटनेचे उपाध्यक्ष श्रीधर जंजीरकर यांनी व्यक्त केले आहे.