मुरूड जंजिरा:
मुरुड तालुक्यात दोन दिवसांपासून थंडीचे आगमन झाले असून या गुलाबी थंडी बरोबरच मुरुडमध्ये शुक्रवार पासून पर्यटकांची तोबा गर्दी झाली आहे.तालुक्यातील मुरुडसह काशिद, नांदगाव व अन्य बीच पर्यटकांनी हाऊसफुल्ल झालेले दिसून आले.मुरूड परिसरातील सर्व लॉजिंग व हॉटेलिंग व्यवस्था फुल्ल झाल्याची माहिती मुरूड मधील गौरी लॉजचे मालक मनोहर बैले यांनी रविवारी दुपारी बोलताना दिली.पर्यटक किनाऱ्यावर मनोरंजनाचा आनंद लूटताना दिसत होते. आधिक माहिती घेता अलिबाग पासून मुरूड, श्रीवर्धन, दिवेआगर परिसरात पर्यटकांचे लोंढे ठिकठिकाणी दिसून येत होते. दिवाळी सुट्टी संपेपर्यंत पर्यटकांचा फिवर असाच राहील असे दिसून येत आहे.
सध्या हिवाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरु असल्याने पर्यटकांत बच्चे कंपनी तसेच कुटुंबातील सदस्यांची संख्या मोठी आहे.या पर्यटकांच्या आगमनाने येथील बहुतांशी लॉजिंग,बोर्डिंग हाऊसफुल्ल झाल्या आहेत.अशी माहिती नांदगावच्या दुर्वा खानावळचे मालक नरेश कुबल यांनी दिली.गणपती सणानंतरही येथे असलेले पावसाचे सावट, मुलांच्या परीक्षा व खराब रस्त्यांमुळे अगदी दिवाळी पर्यंत येथे पर्यटकांचा पत्ता नसल्याने लॉजिंग बोर्डिंग मालक चालकांसह येथील इतर छोटे मोठे व्यावसायिक चिंताक्रांत होते परंतु दिवाळीचा मुख्य सण संपताच येथील तापमानात घट होतांना गुलाबी थंडीसह पर्यटकांच्या आगमनाने त्यांच्यात मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झालेआहे.पर्यटन व्यवसायाला अनेक दिवसानंतर सुगीचे दिवस आल्याचे सांगण्यात आले. प्रसिध्द जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने काही पर्यटकांना जलदुर्ग न पाहता परतावे लागल्याचे काशीद येथील सूर्यकांत जंगम यांनी सांगितले.
मुरुडमधील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची तोबा गर्दी
