मुरबाड – महाराष्ट्राला सध्या उन्हाळ्याचा झळा जाणवत असून अनेक भागांत पाणीटंचाई जाणवत आहे. मे महिन्याच्या सुरू होण्याच्या आधीपासूनच मुरबाड तालुक्याला टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मुरबाडपासून ४० ते ५० किलोमीटर असलेल्या गावांना मुरबाड शहरातील एमआयडीसीमधील पाईपलाईनच्या माध्यमातून टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी भरण्यासाठी नागरिकांना सकाळी मुरबाड एमआयडीसीमध्ये रांग लावावी लागत आहे.
मुरबाड तालुक्याचे तापमान सध्याच्या घडीला ४३ टक्के असून नद्या, नाले, छोटे बंधारे, विहिरी, बोअरवेलमधील मोठ्या प्रमाणात आटले आहे. नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू असताना शासनाच्या विकास निधीचे कोटी रुपये खर्च करणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मग्न आहेत, अशी रहिवाशांची तक्रार आहे.
मुरबाड तालुक्यात काळू, भातसा, बारवी, मुरबाडी नद्यांची उगमस्थाने असून पाटबंधारे विकास महामंडळाचे अनेक छोटे बंधारे आहेत. मुंबईसह परिसरातील शहरांना प्रचंड पाणीपुरवठा बारवी धरणाच्या माध्यमातून होत असताना मुरबाड तालुक्याची पाणीटंचाई आजही संपुष्टात आली नसल्याची खंत स्थानिक व्यक्त करत आहेत.