बंगळुरू- जमीन वाटप घोटळ्याप्रकरणी कर्नाटकातील म्हैसूर नागरी विकास प्राधिकरण (मुदा)च्या कार्यालयावर आज ईडीच्या पथकाने छापेमारी केली. त्यात ईडीच्या पथकाने याप्रकरणाची कागदपत्रे ताब्यात घेतली.
या छापेमारीदरम्यान कार्यालयाबाहेर सीआरपीएफ जवानांसह स्थानिक पोलीस तैनात करण्यात आले होते. ईडीच्या या पथकात १२ अधिकाऱ्यांना समावेश होता. या प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या कुटुंबियांचेही नाव आहे.
जुलैमध्ये लोकायुक्त आणि पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत अब्राहम यांनी आरोप केला होता की, सिद्धरामय्या यांच्या पत्नी बीएम पार्वती यांना म्हैसूरच्या एका उच्चभ्रू परिसरात १४ जागांचे बेकायदेशीरपणे वाटप करण्यात आले होते. यामुळे सरकारी तिजोरीचे ४५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या तक्रारीत सिद्धरामय्या, त्यांच्या पत्नी, मुलगा एस. यतिंद्र आणि मुदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश आहे. आणखी एक सामाजिक कार्यकर्ते स्नेहमयी कृष्णा यांनीदेखील कथित जमीन घोटाळ्यात सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता.