पुणे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द आतापर्यंत समाजाने मोडलेला नाही. आम्ही फक्त त्यांच्या शब्दासाठी शांत आहोत. पण बीड प्रकरणातून एक जरी आरोपी सुटला, तर मराठ्यांना मुख्यमंत्र्यांनी धोका दिला असा संदेश समाजात जाईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता धनंजय मुंडेंना पाठीशी घालू नये. त्यांनी राज्यातील जनता व संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे सिद्ध करावे, असे आवाहन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर जरांगे म्हणाले की, धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा की नाही, हा आमचा प्रश्नच नाही. त्यांनी जातीय तेढ निर्माण करू नये. आम्ही संतोष देशमुख यांच्यासाठी न्याय मागितला तर आम्हाला जातीयवादी म्हणले जात. हे नवीन षडयंत्र आहे. धनंजय मुंडे मराठा समाजावर आरोप करत असतील, तर आम्हीदेखील त्यांना जरूर प्रत्युत्तर देऊ. जर तुम्ही मोर्चे काढले, तर आम्हीदेखील मोर्चे काढू. त्यामुळे धनंजय मुंडे वेळीच शहाणा हो, आम्ही आता थांबणार नाही. ज्या मराठ्यांनी तुला साथ दिली, त्यांच्यावरच पलटण्याचा प्रयत्न करू नकोस.