मुंबई – कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील प्रचाराने सध्या चांगलाच वेग घेतला आहे.या राज्यात सत्ताधारी भाजप, काँग्रेस आणि सेक्युलर जनता दल या तीन पक्षांमध्ये लढत होत आहे. मात्र मुख्य लढत ही भाजपा आणि काँग्रेसमध्येच होत आहे.अशात कर्नाटकमधील सीमाभागात मराठी भाषिक मते आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याठिकाणी प्रचारात उतरवणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्नाटकमध्ये जाण्याची शक्यता आहे.ते बेळगाव,कारवार,निपाणी,खानापूर,चिकोडीसह अन्य मराठीबहुल भागात प्रचार करणार आहेत.मुख्यमंत्री शिंदे हे सुमारे दोन ते तीन दिवस प्रचारात सहभागी होतील,अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान,कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मे महिन्याच्या १० तारखेला मतदान होणार आहे. तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.कर्नाटकमध्ये २२४ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी ११३ जागांची आवश्यकता असते.त्यामुळे यावेळी कुठला पक्ष स्पष्ट बहुमत मिळवतो की,गेल्या वेळी प्रमाणे पुन्हा त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे
मुख्यमंत्री शिंदे कर्नाटकात भाजपासाठी प्रचार करणार
