मुख्यमंत्री शिंदे आज हजारो शिवसैनिकांसह अयोध्येला निघाले
स्वागत गेट! 100 बाईक! 150 किमीवर बॅनरबाजी! योगींची भेट!

अयोध्या – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे आमदार, खासदार यांच्या अयोध्या दौर्‍याची जय्यत तयारी झाली आहे. हे सर्वजण उद्या शनिवारी रात्रीच्या विमानाने लखनऊला रवाना होतील. त्यांच्या स्वागतासाठी लखनऊ ते अयोध्या मार्गावर त्यांचे हजारो बॅनर लागले आहेत. अयोध्येला जाताना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासह शंभर बाईकची रॅलीही निघणार आहे. शिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची खास भेटही निश्‍चित झाली आहे.
शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून हा पहिलाच अयोध्या दौरा असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निमित्ताने अयोध्येत वातावरण भगवामय झाले आहे. शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आधीपासूनच अयोध्येत दाखल झाले असून ते या दौर्‍याची वातावरण निर्मिती करत आहेत. अयोध्येतील हनुमान गढी, राममंदिर परिसरासह ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची पोस्टर लावण्यात आली आहेत. त्यावर चलो अयोध्या प्रभू श्रीरामजी का सन्मान, हिंदुत्व का तीर कमान असे लिहिले आहे. या पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू रामचंद्र यांचे फोटो आहेत. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे फोटो आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही भला मोठा फोटो आहे. अयोध्येत शिवसेनेचे भगवे झेंडेही लावण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत सुमारे 3 हजार शिवसैनिक रविवारी सकाळी अयोध्येत दाखल होतील. आज हे शिवसैनिक विशेष ट्रेनने लखनऊला रवाना झाले तेव्हा मुख्यमंत्री शिंदेंनी उपस्थित राहून हिरवा झेंडा दाखवला. ढोल-ताशांच्या गजरात भगवे झेंडे नाचवत शिवसैनिकांनी ठाणे रेल्वे स्थानकावर अयोध्येला जाण्यासाठी गर्दी केली होती. अयोध्येला जाण्यासाठी नाशिक येथूनही विशेष ट्रेन अयोध्येसाठी सोडण्यात आली. या सर्वांना राहण्यासाठी अयोध्येतील हॉटेल, गेस्ट हाऊस आणि धर्मशाळा आधीच बुक करण्यात आल्या आहेत. शिंदे हे लखनऊहून अयोध्येला रस्त्याच्या मार्गाने जाणार असल्याने त्यांच्या समर्थकांनी लखनऊ विमानतळ ते अयोध्या या 150 किमीच्या महामार्गावर स्वागत गेट, बॅनर आणि पोस्टर्स लावण्याचे नियोजन केले आहे. अयोध्येच्या महंतांनी मुख्यमंत्र्यांना राममंदिराला भेट देण्याचे वैयक्तिक आमंत्रण दिल्याने आणि महाराष्ट्र सरकारने मंदिर उभारणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून मौल्यवान सागवानाची पहिली खेप पाठवल्यानंतर एका आठवड्यानंतर या घडामोडी घडत आहेत. शिंदे यांच्या अयोध्या दौर्‍याला देशभरात ठळकपणे प्रसिद्धी देण्यासाठी शिवसेनेने नियोजन केले आहे. मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते व महाराष्ट्रातील शिवसैनिकांव्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील विविध भागांतून सुमारे 10 हजार शिवसेना कार्यकर्ते शिंदे यांच्या स्वागतासाठी अयोध्येत जमणार आहेत. या दौर्‍याचा आणखी एक टीझर आज शिवसेनेने जारी केला.
9 एप्रिलला अयोध्येत पोहचल्यावर मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदा प्रभू रामाचे दर्शन घेऊन नंतर हनुमान गढी दर्शन पूजन, मंदिराच्या बांधकाम जागेची पाहणी, शरयू आरती आणि लक्ष्मण किल्ला मंदिरात संतांचे आशीर्वाद घेतील आणि 9 एप्रिलला संध्याकाळी शरयू आरती झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन
मुंबईला परततील.
या दौर्‍याबाबत हॉटेल्स असोसिएशनचे निमंत्रक अनिल अग्रवाल म्हणाले की, शिवसैनिकांच्या निवासासाठी हॉटेलच्या खोल्या ऑनलाईन बुक केल्या आहेत. आम्ही यजमानपदासाठी तयार आहोत. तर अयोध्येचे जिल्हा दंडाधिकारी नितीश कुमार म्हणाले की, अयोध्येत येणार्‍या या लोकांना सर्व सुविधा पुरविणे हे आमचे कर्तव्य असणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत येणार्‍या सर्व व्हीआयपींना सर्व आवश्यक प्रोटोकॉल दिला जाईल.

असा असेल दौरा
9 एप्रिल
10.30 – लखनऊहून हेलिकॉप्टरने अयोध्या
12.00 – राम मंदिरात महाआरती
12.30 ते 1.30 – मंदिर निर्माण पाहणी
दुपारी 2.30 – पत्रकार परिषद
दुपारी 3.00 – लक्ष्मण किल्ला मंदिरात दर्शन
सायं. 6 ते 8 – शरयूकाठी महाआरती
रात्री 9 वा. – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लखनऊ येथील निवासस्थानी भेट
रात्री 11.30 – मुंबईकडे प्रयाण

Scroll to Top