मुख्यमंत्री दुर्गा …. सुषमा स्वराज (दिल्ली)
राजकारणात असूनही जनतेची लाडकी असलेली जी व्यक्तिमत्त्वे आहेत त्यात सुषमा स्वराज यांचे नाव आहे. हरियाणात जन्म झालेल्या सुषमा स्वराज या सुरुवातीपासून भाजपाच्या अभाविपशी निगडीत होत्या. पण राजकारणात न येता त्यांनी सुप्रीम कोर्टात वकिली केली. जॉर्ज फर्नांडिस यांच्या वकिलांच्या गोटात त्यांनी काम केले. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सहभाग घेतला आणि आणीबाणीनंतर जनता पार्टी सोडून भाजपाच्या सदस्य झाल्या. 1998 साली ऑक्टोबर महिन्यात त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. दुर्दैवाने त्याच वर्षी केवळ दोन महिन्यांनंतर त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. पण त्यांना केंद्रात महत्त्वाची मंत्रालये मिळाली. परराष्ट्र्रमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली. त्या अत्यंत लोकप्रिय ठरल्या. 2019 साली हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांची कन्या बांसुरी सध्या दिल्लीची भाजपाची आमदार आहे.
मुख्यमंत्री दुर्गा …. शिला दीक्षित (दिल्ली)
शिला दीक्षित या काँग्रेस नेत्या 1998 पासून तब्बल 15 वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांनी लागोपाठ तीन विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला यश मिळवून दिले. 2023 साली मात्र अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दिल्लीत काँग्रेसचा धुव्वा केला. या पराभवानंतर त्यांना केरळचे राज्यपाल केले. 2019 साली त्यांनी लोकसभा निवडणूक लढवित राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा पराभव झाला. त्याच वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांचे पुत्र संदीप दीक्षित हे खासदार होते. मुलगी लतिका हिचा आर्किटेक्ट सय्यद मोहम्मद इम्रान यांच्याशी विवाह झाला असून, त्या राजकारणात नाहीत.
मुख्यमंत्री दुर्गा ….
उमा भारती (मध्य प्रदेश)
वादग्रस्त बाबरी मशीद पाडण्याचे आंदोलन आणि राम जन्मभूमी चळवळीत आघाडीवर असणार्या जहाल नेत्या उमा भारती आता सक्रिय राजकारणापासून काहीशा दूर आहेत. पण एकेकाळी त्यांचा दरारा होता. 2003 साली त्यांच्या नेतृत्त्वात भाजपाला मध्य प्रदेशात शंभर टक्के यश मिळाले आणि त्या मुख्यमंत्री झाल्या. पण दुर्दैवाने लगेचच 2004 साली हुबळी दंगल खटल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. विशेष म्हणजे या जहाल नेत्या शाळेत असताना अत्यंत धार्मिक होत्या. भगवद्गीतेवर त्या प्रवचन द्यायच्या. त्यातूनच त्यांची शिंदे घराण्याची ओळख झाली आणि अध्यात्म सोडून त्या राजकारणाकडे वळल्या. भाजपाशी त्यांचे कायम विळा- भोपळ्याचे नाते राहिले आहे.