मायावती (उत्तर प्रदेश)- ‘ठाकूर, ब्राह्मण, बनिया, चोर, बाकी सब डीएसफोर’ ही घोषणा 1980 च्या दशकात उत्तर प्रदेशात घुमत होती, तेव्हा ती देणाऱ्या बहुजन समाज पक्षाची ताकद कुणाच्याही लक्षात आली नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार घेऊन बसपाने उत्तर प्रदेशात आपले राजकारण सुरू केले होते. त्यावेळी कांशीराम यांच्या खांद्याला खांदा लावून मायावती उभ्या होत्या. खरे तर त्यांना आयएएस बनायचे होते. परंतु कांशीराम यांच्या आग्रहाखातर त्या एलएलबी झाल्यावर राजकारणात आल्या. असे म्हणतात की, कांशीराम मायावतींच्या घरी गेले होते. त्यांनी मायावतींना म्हटले की, मी तुला इतका मोठा नेता बनवेन की, आयएएस अधिकाऱ्यांची तुझ्यापुढे रांगच लागेल. आणि पुढे खरोखर तसेच घडले. मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बनल्या, तेव्हा त्या देशातील पहिल्या महिला दलित ठरल्या. विशेष म्हणजे, एकदा नव्हे, तर चार वेळा त्यांनी हे पद ताकदीने भुषवले.
पहिल्यांदा 3 जून 1995 ते 18 ऑक्टोबर 1995, दुसऱ्यांदा 21 मार्च 1997 ते 21 सप्टेंबर 1997, तिसऱ्यांदा 3 मे 2003 ते 29 ऑगस्ट 2003, चौथ्यांदा 13 मे 2007 ते 15 मार्च 2012 अशा चार वेळा मुख्यमंत्रिपद सांभाळताना त्या काँग्रेस, भाजपा आणि समाजवादी या तिन्ही पक्षांच्या उत्तर प्रदेशातील राजकारणाला पुरून उरल्या. 2001 मध्ये कांशीराम यांनी मायावतींना आपला वारस म्हणून नेमले. त्यानंतर त्यांनी दलित राजकारणाला थोडे बाजूला करून सर्वसमावेशक राजकारणाला सुरुवात केली. ‘हाथी नही गणेश है, ब्रह्मा विष्णू महेश है’ ही नवी घोषणा आली. मायावती त्याला सामाजिक अभिसरण म्हणत. फरक इतकाच की ते उलटे होते.
आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात मायावतींनी अनेक धाडसी निर्णय घेतले. मग ते उत्तर प्रदेशातील जिल्ह्याची नावे घाऊक पद्धतीने बदलणे असो की, पुतळे आणि स्मारके बनवून जागोजागी स्थापित करणे असो. विशेष म्हणजे मायावती यांच्या सरकारने जे पुतळे बनवले, त्यात त्यांचा स्वतःचाही पुतळा होता. त्यावर करदात्यांचा पैसा वाया घालवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. अब्जावधी रुपयांच्या ताज कॉरिडॉर प्रकल्पात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. 2007 मध्ये 26 कोटी रुपयांचा कर भरून मायावती देशातील सर्वाधिक कर भरणाऱ्या 20 करदात्यांच्या यादीत समाविष्ट झाल्या. तरीही त्यांच्याविरुद्ध उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी खटला चालवण्यात आला. आपल्या कारकिर्दीत मायावतींनी अनेकदा स्वतःच वाद ओढवून घेतले. उत्तर प्रदेशात हळूहळू बसपाचा प्रभाव कमी होऊ लागला, तशी मायावतींची एकेकाळी कट्टर विरोधक भाजपाबद्दलची भूमिकाही मवाळ होत गेली. ही त्यांची सर्वात मोठी घोडचूक होती, असे त्यांचे समर्थक आणि विरोधक दोघेही मानतात.
मुख्यमंत्री दुर्गा ……..
