राज्यातील सर्वोच्चपदी म्हणजे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसून राज्याचा गाडा हाकण्याचा मान देशातील मोजक्या कर्तृत्त्ववान महिलांना मिळाला. नवरात्रीच्या निमित्ताने या राजकारणातील मुख्यमंत्री राहिलेल्या दुर्गांची ओळख करून देणारी ही अनोखी माळ.
सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश)
भारताच्या इतिहासात एखाद्या राज्याच्या सर्वात पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान सुचेता कृपलानी यांना मिळाला. विशेष म्हणजे भारतातल्या सर्वात
मागास
राज्यांपैकी एक असलेल्या उत्तर प्रदेश राज्याच्या त्या मुख्यमंत्री बनल्या. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशशी त्यांचा तसा काही संबंध नव्हता. त्या मूळच्या बंगालच्या होत्या. त्यांचे शिक्षणही दिल्लीत झाले होते. त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद कसे मिळाले याची कहाणी काहीशी रंजकच आहे. स्वातंत्र्यानंतर देशात काँग्रेसची सत्ता आल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान बनले. काही वर्षांत त्यांच्या पक्षातीलच काही लोक त्यांना आव्हान देऊ लागले. यात सगळ्यात मोठे नाव उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री सी. बी. म्हणजेच चंद्रभानू गुप्ता यांचे होते. त्यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करण्यासाठी काँग्रेसने 1963 मध्ये कामराज योजना आणली. या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यात पक्ष मजबूत व्हावा म्हणून जुन्या लोकांना त्यांची पदे सोडावी लागली. या योजनेअंतर्गत जवाहरलाल नेहरूंनी सी. बी. गुप्ता यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या
मुख्यमंत्रिपदी सुचेता कृपलानी यांची निवड झाली. चार वर्षे त्यांनी हे पद सांभाळले.
याचा अर्थ सुचेता कृपलानी या पदासाठी पात्र नव्हत्या असे नाही. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे योगदान योगदान न विसरता येण्याइतके मोठे होते. 1940 मध्ये त्यांनी ऑल इंडिया महिला काँग्रेसची स्थापना केली. 1942 ते 1944 या काळात स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून आंदोलन केले. अरुणा असफ अली आणि उषा मेहता यांच्याप्रमाणेच त्या भारत छोडो आंदोलनादरम्यान आघाडीवर होत्या. फाळणीच्या दंगलीत त्यांनी महात्मा गांधींसोबत काम केले. 1944 मध्ये त्यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. संसदेमध्ये ’वंदे मातरम’ गाण्याचा पहिला मान कृपलानींना मिळाला होता. सुचेता उच्च विद्याविभूषित होत्या. आपल्या विचारांवर ठाम, पण स्वभावाने सौम्य अशी त्यांची ओळख होती. त्यांचे वक्तृत्व चांगले होते. राहणीमान साधे होते. राजकारणात त्यांनी पक्षांतरही केली. 1948 मध्ये त्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भारताच्या प्रतिनिधी होत्या 1971 पर्यंत त्या लोकसभेच्या खासदार राहिल्या. 1971 मध्ये त्या राजकारणातून निवृत्त झाल्या आणि 1974 मध्ये मृत्यूपर्यंत त्या
एकांतवासात जगल्या.