मुंबई – राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील निकाल केव्हाही लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री बदलण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू असल्याची कुजबुज सुरू आहे. दुसरीकडे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातूनही रोज नव्या चर्चांना उधाण येत आहे. या गदारोळात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही कर्नाटक दौर्यावर गेले आहेत. सध्या वेगाने घडत असलेल्या राजकीय घडामोडी पाहता दोघांपैकी एकाने मुंबईत थांबणे गरजेचे होते. शिंदेंच्या अचानक सुट्टीमुळे चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सुट्टीची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री असे सुट्टीवर जाण्याची पहिलीच वेळ असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 24 ते 26 एप्रिल दरम्यान सुट्टीवर असल्याचे समजते. त्यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांसोबत एक बैठक घेतली. त्यानंतर आपण सातारा जिल्ह्यातल्या आपल्या गावी जात असल्याचे यावेळी कर्मचार्यांना सांगितले. त्यांच्या गावी ते देवपुजेसाठी गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, एकीकडे अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, त्यांनी मुख्यमंत्री होण्याची बोलून दाखवलेली उघड इच्छा, सत्तासंघर्षाचा निकाल केव्हाही येण्याची शक्यता. या सार्या घडामोडीत मुख्यमंत्री सुट्टीवर गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
काय असू शकतात
या सुट्टीमागची कारणे?
1) सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केव्हाही येऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर हा निकाल आपल्या बाजूने लागावा, यासाठी एकनाथ शिंदे गावातल्या देवीला साकडे घालणार असल्याचे समजते. शिवाय राजकीय कोलाहलातून थोडी विश्रांती हा सुद्धा त्यामागचा
हेतू आहे.
2) अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला, तर भाजप अजित पवारांना सोबत घेणार असल्याची चर्चा आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याचे समजते. ते त्यांना उघडपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी हा पर्याय
निवडल्याचे समजते.
3) महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 14 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. या प्रकरणी विरोधक चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणी राज्यपालांची भेट घेऊन दबाव वाढवला. यामुळेही एकनाथ शिंदे सुट्टीवर गेल्याचे समजते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रजेवर अचानक सुट्टीमुळे चर्चांना उधाण
