मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जुलैपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार

मुंबई – राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेल्या दहा महिन्यांच्या या तणावाच्या परिस्थितीतून मुक्तता मिळाल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा मंत्रिमंडळ विस्ताराकडे वळवला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी माहिती त्यांनी दिली.

राज्यातील सत्तासंघर्षांबाबत सर्वोच्च न्यायालयांकडून आलेल्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांकडून या निर्णयावर एका वाक्यात प्रतिक्रिया आली. ‘घटनाबाह्य म्हणणारेच कालबाह्य झाले,’ अशा शब्दात त्यांनी उध्दव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकाचे दावे फेटाळून लावले. हे बोलताना मुख्यमंत्र्यांच्या चेह-यावर जो आत्मविश्वास दिसत होता त्यावरुन एकनाथ शिंदे येत्या काही महिन्यात नक्की काहीतरी चमत्कार घडवू शकतात याची चुणूक दिसून आली. मुख्यमंत्र्यांनी या सा-या दहा महिन्यांच्या घडामोडीचा पट उलगडला.

ते म्हणाले, ‘आता सर्वात प्रथम प्राथमिकता म्हणजे पक्षविस्तार. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्रलंबित असताना माझ्या संपर्कात केवळ ठाकरे गटाचेच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ही अनेक नेते संपर्कात होते पण त्यांना निकालाची धास्ती होती. आता ही धास्ती दूर झाली आहे. आता त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.’ गेल्या दहा महिन्यांच्या तणावाबाबत ते म्हणाले, ‘तणाव तर होताच पण माझे ४० आमदार सतत बरोबर आहेत हा प्रचंड विश्वास होता आणि त्याच बळावर हा ताण सुसाह्य झाला. ज्या विश्वासाने या ४० जणांनी माझ्याबरोबर मुंबई ते गुवाहाटी प्रवास केला ते बळ माझ्या बरोबर होतं. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून असलेली जबाबदारी आणि त्याच वेळी रोज नवे आव्हान होते.’
मंत्रिमंडळ विस्तार आता लवकरच होईल. पावसाळी अधिवेशनाच्या आधी तर नक्कीच. आता आमच्याकडे कोणी नाराज राहणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. सोबतच्या पक्षांना वाढू द्यायचे नाही हा भाजपचा लौकीक आहे, असे विचारता ते म्हणाले की आमच्यातला समन्वय उत्तम आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top