मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स अजूनही कायम! दिल्लीकडे लक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची गटनेतेपदी निवड

मुंबई – महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला अतिप्रचंड असे बहुमत दिले. भाजपाला एकट्याने सत्तास्थापन करता येईल या स्थितीच्या अगदी जवळ आणून ठेवले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून नाव लगेच घोषित होईल अशी जनतेची अपेक्षा असली तरी आजचा पूर्ण दिवस मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स कायमच राहिला. सरकार स्थापनेच्या हालचाली मात्र आज वेगाने सुरू होत्या. येत्या मंगळवारी 26 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झाले पाहिजे, असे सांगितले जात असले तरी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले की, 26 नोव्हेंबर ही सरकार स्थापनेची अखेरची तारीख आहे की नाही हे अजून स्पष्ट नाही. 2004 साली निवडणूक होऊन आमदार निवड कायम झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा पुढे एक महिना सुरू होती. त्यामुळे तांत्रिकरित्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेण्यास मुदत असावी असेच प्रफुल्ल पटेल यांनी सुचित केल्याने मंगळवारपर्यंत महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळेलच याची आता खात्री देता येणार नाही.
आज देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपाचे सर्व आमदार जमतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही. काही निवडक नेते देवेंद्र फडणवीस यांना येऊन भेटत होते. आज देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील आणि दिल्लीहून परतल्यानंतर आमदारांची बैठक होऊन गटनेता निवड होईल असेच चित्र होते. एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटात मात्र सकाळपासून वेगवान हालचाली घडल्या. अजित पवार यांनी देवगिरी बंगल्यावर आपल्या सर्व आमदारांना आमंत्रित केले होते. सकाळी 11 वाजताच सर्व आमदारांची एकत्र बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर झाला. त्यानंतर अजित पवार यांची गटनेतेपदी निवडही झाली. पराभूत आमदारांना फोन करून धीर देण्यात आला. अजित पवारांच्या गटाची आमदारांची यादी तयार करण्यात आली. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी सायंकाळी 6 वाजता वांद्रे येथील पंचतारांकित ताज लँड्सएंज हॉटेलात आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी आमदार सकाळपासूनच या हॉटेलात जमू लागले होते. नांदेडच्या शिंदे गटाच्या विजयी आमदारांना मुंबईत आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी खास विमान पाठवले. सायंकाळी आमदारांशी संवाद साधल्यानंतर एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी अधिकृतपणे निवड करण्यात आली. त्यांच्याही आमदारांची यादी तयार करण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा त्यांच्या गटाच्या अनेक आमदारांनी बोलून दाखवली. किंबहुना एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात अशी आज कुजबूज होती. निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी आज राजभवनला जाऊन राज्यपालांकडे विजयी आमदारांची अधिकृत यादी सुपूर्द केली. यामुळे आता सत्तास्थापनेसाठी राज्यपालांना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची यादी पक्षाकडून देण्याचे सोपस्कार पूर्ण करून यादी तयार करण्यात आली आहे. भाजपा आमदारांची यादीही फडणवीस दिल्लीहून परतल्यानंतर तयार होईल. मात्र मुख्यमंत्री कोण होणार याची अद्याप कुणकुणही लागलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवून महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार का? हा प्रश्‍न आजही अनुत्तरीत राहिला.
मंत्रिपद वाटपाबाबतही आज दिवसभर चर्चा सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहा ते सात आमदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार भाजपा 21, शिंदे गटाला 12 आणि अजित पवार गटाला 10 मंत्रिपदे मिळणार आहेत.
दरम्यान आज मविआच्या नेत्यांनी पुन्हा एकदा निकालाबाबत जाहीरपणे आक्षेप नोेंदवला. नाना पटोले, संजय राऊत यांनी हा निकाल अशक्य असल्याचे पुन्हा एकदा बोलून दाखवले. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्वीट करत म्हटले की, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतीला मोफत वीज, सोयाबीनला प्रति क्विंटल 6 हजार रुपये भाव आणि लाडक्या बहिणीला प्रती महिना 2100 रुपये ही आश्‍वासने पहिल्याच कॅबिनेटमध्ये पूर्ण होतील या अपेक्षेसह नव्या सरकारला शुभेच्छा.

फडणवीस यांच्या नावाला विरोध नाही-भुजबळ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीनंतर छगन भुजबळ म्हणाले की, आजच्या बैठकीत अजित पवार यांची विधिमंडळ नेता म्हणून सर्वानुमते निवड झाली आहे. परंतु शिवसेना शिंदे गट आणि भाजपाचे नेते कोण याची अजून अधिकृतपणे माहिती मिळालेली नाही. परंतु मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या नावाला विरोध असण्याचे
कारण नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top