मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत
अदानी अजूनही दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : फोर्ब्सने मंगळवार ४ एप्रिल रोजी जगातील अब्जाधीशांची ३७ वी वार्षिक यादी जाहीर केली. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सलग दुसऱ्या वर्षी टॉप-१० मध्ये स्थान मिळवले आहे. २०२२ मध्ये ९०.७अब्ज डॉलरच्या संपत्तीसह ते १०व्या स्थानावर होते. तर आता २०२३ मध्ये ८३.४अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते ९व्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानी यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी गौतम अदानी जागतिक यादीत २४ व्या स्थानावर घसरले आहेत. २४ जानेवारी रोजी अदाणी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यावेळी त्यांची संपत्ती १२६ अब्ज डॉलर होती. मात्र, हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर त्यांच्या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी घसरण झाली.

फोर्ब्सने जाहीर केलेल्या माहितीनुसार अदानी यांची एकूण संपत्ती आता ४७.२ अब्ज डॉलर्स असून ते अंबानीनंतर दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. मुकेश अंबानी हे ८३.४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील ९व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सने म्हटले आहे की, गेल्या वर्षी अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज १०० अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त महसूल मिळवणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. त्यांचा व्यवसाय तेल, दूरसंचार ते रिटेलपर्यंत पसरलेला आहे.

मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या वर्षीच्या यादीत मुकेश अंबानी मायक्रोसॉफ्टचे स्टीव्ह बाल्मर, गुगलचे लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन, फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग आणि डेल टेक्नॉलॉजीजचे मायकेल डेल यांच्यापेक्षा वर आहेत. जगातील श्रीमंतांच्या यादीत बर्नार्ड अर्नाल्ट पहिल्या क्रमांकावर, एलन मस्क दुसऱ्या आणि जेफ बेझोस तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर फोर्ब्सच्या यादीनुसार, शिव नाडर हे तिसरे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. तर सायरस पूनावाला हे देशातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. यातच स्टील बॅरन लक्ष्मी मित्तल पाचव्या, ओपी जिंदाल ग्रुपच्या सावित्री जिंदाल सहाव्या, सन फार्माचे दिलीप सांघवी सातव्या आणि डीमार्टचे राधाकृष्ण दमाणी आठव्या क्रमांकावर आहेत.

Scroll to Top